महात्मा फुलेंवर “सत्यशोधक” चित्रपट प्रदर्शित…
पाच जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात ‘महात्मा जोतीराव फुले’ व ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जीवन कार्यावर आधारित “सत्यशोधक” चित्रपट प्रदर्शित झाला. समता फिल्म्स निर्मित व निलेश जळमकर दिग्दर्शित या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका अभिनेता संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाईची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी केली. तसेच या चित्रपटाला अमित राज यांनी सुरेख संगीतबद्ध केलेआहे.
चित्रपट इतका सुरेख झाला की, महाराष्ट्रातील सर्वच स्तरातील व्यक्तींनी चित्रपटाचे कौतुक केले. चित्रपट “सुपरहिट” ठरला. महाराष्ट्र शासनानेही त्वरित “टॅक्स फ्री” केला. पहिल्यांदा महात्मा फुलेंचा इतिहास खऱ्या अर्थाने सर्वासमोर आला, त्यामुळे सर्वांनी मोठ्या उत्साहात या चित्रपटाचे स्वागत केले व उत्तम प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद खऱ्या अर्थाने चित्रपटाला नव्हे तर फुलेंच्या इतिहासाला सर्वांनी दिलेली ती ‘मानवंदना’ ठरली.
“सत्यशोधक” चित्रपट प्रदर्शित होत असतांना महात्मा फुलेंचा इतिहास मात्र जागा झाला. दीडशे वर्षानंतर हा इतिहास सर्वासमोर आला. हा इतिहास मांडण्याच्या मागे जो संघर्ष करावा लागला, तो ही अफलातून होता. महात्मा फुलेंचा इतिहास चित्रपटातून मांडणे म्हणजे इतिहास घडवण्यासारखेच होते.
महात्मा फुलेंचा इतिहास अवघड
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना नव्या विचारांचे ‘आद्य क्रांतीपुरुष’ मानले जाते. त्यांनी विविध अंगी कार्य केले आहे. धार्मिक, राजकीय, सामाजिक, कृषी व सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले. त्यांच्या प्रत्येक कार्याला कृतीची जोड होती. त्यांनी पहिल्यांदा देव, धर्म व रूढी-परंपरा यावर चिकित्सा करून सर्वसामान्यासमोर सत्य विचार ठेवले. वैचारिक व मानसिक गुलामीतून होणारी सर्वसामान्य लोकांची पिळवणूक त्यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच अनेक चुकीच्या रूढी-परंपरेवर आसूड ओढले. रूढी-परंपरेत अडकलेल्या स्रिया व गोरगरीब जनतेला धर्माच्या विळख्यातून सोडवले. त्यांच्यात एक नवा विचार पेरला.
अतिशय संघर्षमय, अवघड आणि तितकाच वादात्मक इतिहास मांडण्यासाठी अनेकांनी धडपड केली. कुणी भाषणातून विचार मांडले, तर काहींनी काही पुस्तके लिहिली. तरीही खऱ्या अर्थाने महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचलेच नाही. अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक’ समजाची निर्मिती केली. मात्र ती चळवळही आज थांबलेलीच म्हणता येईल. ही चळवळ पुढे नेण्याची ज्यांची जबाबदारी होती, ती शिकलेली मंडळी पुन्हा नव्याने कर्मकांडात अडकली. त्यामुळे त्या सत्यापासून अजूनच लोक लांब गेले. त्यांना पुन्हा सत्य विचारांची आठवण करून देण्यासाठी फुलेंचा इतिहास सर्वासमोर येणे अतिशय महत्त्वाचे होते. ते कार्य ‘सत्यशोधक’ चित्रपटातून पूर्ण होणार होते. हा इतिहास सर्व जगासमोर यावेत म्हणून पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा खूप प्रयत्न खूप केले होते.
डॉ. बाबासाहेब हे महात्मा फुलेंना गुरु मानत
अनेक वर्ष गुलामगिरी आणि अंधश्रद्दा मध्ये अडकलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने सत्य आणि आपल्या अधिकारांची जाणीव महात्मा जोतीराव फुलेंनी करून दिली. ज्याप्रमाणे अनेक दिवस स्मशानभूमीत झोपलेल्या माणसाला अचानक उठवाव आणि त्याला कळाव की, मी स्मशानात नसून एक महालात राजगादीवर झोपलेलो आहे. त्याप्रमाणे अनेक वर्ष अंधकारात पिचलेल्या समाजाला जोतीरावांनी असेच काही सांगितले, दाखवले आणि समाज खाडकन जागा झाला. त्यांना त्यांच्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली.
महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८३० ला झाला व मृत्यू २८ नोव्हेंबर १८९० मध्ये झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ११ एप्रिल १८९२ साली झाला. दोघांनीही एकमेकाला बघितले नाही. मात्र तरीही डॉ. बाबासाहेबांनी फुलेंना आपले गुरु मानले. याला कारण एकमेकांचे विचार. डॉ. बाबासाहेब लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी जोतीरावांना जाणून घेतले, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास केला. फुलेंचा समतेचा व मानवतेचा विचार बाबासाहेबांनी स्वीकारला आणि मोठा लढा उभा केला. बहुजनांचे, गोरगरिबांचे हित शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही, त्यासाठी फुलेंनी केलेले कार्य पुढे बाबासाहेबांनी चालू ठेवले. तीच जागृती गोरगरीब लोकांसाठी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यभर केली. फुलेंचा वारसा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी पुढे नेला. म्हणून त्यांच्यावर चित्रपट निघावा असे बाबासाहेबांना वाटायचे.
आचार्य अत्रेंनी चित्रपट काढला…
महात्मा फुलेंचा इतिहास सर्वसामान्यांपुढे यावा, असे काही लोकांना आवर्जून वाटत होते. त्यापैकीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे. महात्मा फुले यांचा क्रांतिकारी प्रवास चित्रपटात मांडण्याचा पहिला प्रयत्न आचार्य अत्रेंनी केला. सन १९५३ साली आचार्य अत्रेंनी महात्मा फुले यांच्यावर पहिला चित्रपट केला. खरे तर हा चित्रपट व्हावा, असा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आग्रह होता. तशी त्यांनी चित्रपटास मदतही केली. आचार्य अत्रेंनी महात्मा फुलेवर संशोधन करून चित्रपट बनवायला घेतला. चित्रीकरणाचे उद्घाटन डॉ. आंबेडकरांनीच केले. तेव्हा अनेक मोठ्या व्यक्ती त्या चित्रपटाला जोडले गेले. प्रबोधनकार ठाकरे, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील असे अनेकांनी त्या चित्रपटात सहभाग घेतला. चित्रपट उत्तम झाला. चित्रपटाचा सन्मान म्हणून शासनाकडून त्यांचा गौरव झाला. त्यावेळी चित्रपट क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कारही चित्रपटाला मिळाला. चित्रपट मोठ्या उत्साहात रिलीज झाला. मात्र तो उत्साह जास्त दिवस टिकला नाही. सर्व व्यवस्था हातात असणाऱ्या कर्मठ ब्राम्हणांनी त्याला विरोध केला व चित्रपट बंद पाडला. पुन्हा त्यांच्यावर कधीच कुणी चित्रपट बनवण्याचे धाडस केले नाही.
शासनाचा प्रयत्न अयशस्वी
माननीय मंत्री श्री. छगनराव भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने शासनाकडून महात्मा फुलेंवर चित्रपट बनवण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. चित्रपटासंबंधी चर्चा झाल्या, निवेदने काढली, समितीही नेमली. दिग्दर्शक जब्बार पटेल व इतिहास संशोधक हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु व्हायचे, पुन्हा थांबायचे. असे बऱ्याच वेळा झाले. मात्र प्रत्येक वेळी प्रयत्न अयशस्वी झाले. आजही शासन महात्मा फुलेवर चित्रपट काढण्याचे आश्वासन देत आहेत. यात कुणावर दोष देण्याचा मुळीच प्रयत्न नाही, मात्र महात्मा फुलेवरील चित्रपटाचा सत्य प्रवास मांडण्यास उशीर झाला.
ज्यांच्या विचारांना अनेक महात्म्यांनी स्वीकारले त्यांचा इतिहास पुस्तकातच बंदिस्त राहिला. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले, राजश्री शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांचे विचार स्वीकारले. प्रबोधनकार ठाकरे, गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे असे अनेकांनी महात्मा फुलेंच्या विचारांना स्वीकारून त्याप्रमाणे कार्य केले. अशा महान व्यक्तींचा इतिहास लोकापर्यंत पोहोचणे गरजेचे होते.
चित्रपटाचा प्रवास
महात्मा फुलेंवर अभ्यास पूर्ण झाला होता. हरी नरके व धनंजय कीर यांनी अथक परिश्रम करून फुलेंवर मोठे संशोधन केले होते आणि ते सर्व संशोधन महाराष्ट्र शासनाने सत्य इतिहास म्हणून प्रसिद्ध केले होते. त्या सर्व पुस्तकांचा आधार घेऊन लेखक-दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी “सत्यशोधक” चित्रपटाची मांडणी केली आहे. आम्ही जसजसा चित्रपटाचा प्रवास पुढे नेत होतो तसतसे माणस जोडत गेलो. श्री. राहुल तायडे, प्रवीण तायडे, आप्पासाहेब बोराटे, भिमराव पट्टेबहाद्दूर, सुनील शेळके, राहुल वानखेडे, बाळासाहेब बांगर अशी मोठी टीम निर्माता म्हणून उभी राहिली. ‘चित्रपट उत्तम करायचा”, सर्वांनी एकमताने निर्णय घेतला. तो करत असतांना अनेक अडचणींना तोंड देत आणि कुठेही कॉम्प्रोमाइज न करता चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाची प्रत्येक बाजू समजून घेऊन, तो काळ उभा केला. कला दिग्दर्शक विश्वनाथ मेस्री, अर्जुन राठोड व संदीप इनामके यांनी उत्तम कला दिग्दर्शन केले. लोकांसमोर खराखुरा तो काळ उभा केला.
पुणे, सातारा, वाई, भोर, फलटण, पनवेल अशा विविध ऐतिहासिक ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण झाले.
समकालीन क्रांतीकारी
महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य चित्रपटात मांडत असतांना त्यांच्या समकालीन महात्म्यांनाही त्याच तोलामोलाने मांडणे गरजेचे होते. कारण त्यांचेही समाजासाठी कार्य मोठ्या प्रमाणात होते. त्यात आद्य क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साळवे, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. विश्राम घुले, कृष्णराव भालेकर, स्वामी अय्यावारू असे अनेक दिग्गज क्रांतीपुरुष “सत्यशोधक” चित्रपटात दाखवले आहेत. त्यांचाही इतिहास पहिल्यांदा चित्रपटातून जनतेसमोर येत होता. लहूजी वस्ताद यांनी अनेक वेळा फुलेंना साथ दिली. स्वत: फुले लहूजी वस्ताद साळवी यांच्या तालमीत जायचे. कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे ते शिकले होते. फुलेंचे क्रांतिकारी विचार ऐकून ते प्रभावित झाले. शुद्रातीशुद्रांवर होणार अन्याय त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी ज्योतीबांच्या प्रत्येक कामात साथ दिली.
फुले दाम्पत्याने आपले घर सोडल्यावर त्यांना साथ दिली ती मुस्लीम सामाजातील उस्मान शेख यांनी. त्याच मुस्लीम समाजात पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला, तो फातिमा शेख यांना. हे सर्व महापुरुष “सत्यशोधक” चित्रपटातून दाखवले आहेत.
चित्रपटातील कलाकार व इतर टीम
महात्मा फुलेंच्या रोल करणे कठीन काम होते. त्यांचे क्रांतीकारी विचार मांडणे, वैचारिक वाद-विवाद करणे, सत्य मांडणे व त्यावर दूरदृष्टीने आपले विचार पटवून देणे सर्वच कठीन होते. तो रोल करणाऱ्या कलाकाराला मोठे चॅलेंज होते. ती सर्व जबाबदारी अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांनी आपल्या अभिनयाच्या ताकदीने महात्मा फुले हुबेहूब उभे केलेत. त्यासाठी मेकपमन राजेश तिवारी यांनी त्यांच्या ‘लुक’ वर विशेष काम केले. तिवारी यांच्या टीमने वयानुसार त्यांचा बदलत जाणारा मेअकप, दाढी या सर्व बाबी काळजीपूर्वक दाखवल्या. त्यामुळे जोतीराव तसेच सावित्रीबाई फुले या पात्रांनी प्रेक्षकांच्या काळजात घर केले. तसेच इतर सर्वच पात्रांनी आपापली जबाबदारी पूर्ण केली. आद्य क्रांतीगुरु लहूजी वस्ताद यांची क्रांतिकारी भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी केली.
“सत्यशोधक” चित्रपटाच्या माध्यमातून एक अजरामर कलाकृती निर्माण झाली.